जितेंद्र सालुंके
• दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घरोघरी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन
भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी उपराष्ट्रीय लसीकरण दिन (Sub-National Immunization Day – SNID) पल्स पोलिओ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा उद्देश पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण देणे हा आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरी लसीकरणासाठी शहरस्तरीय कृती दलाची (City Task Force for Urban Immunization) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड आणि उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा पुरी, जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ (UNICEF), संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP), विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), भारतीय लष्कर, भारतीय नौदल, इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स (IAP), स्वयंसेवी संस्था, धार्मिक संघटनांचे नेते तसेच अन्य संबंधित घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारताला सन २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अधिकृतपणे पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले. तथापि, शेजारील देशांमध्ये पोलिओ विषाणूचा प्रसार अद्याप सुरू असल्याने भारतात या विषाणूचा पुन्हा प्रवेश होण्याचा धोका कायम आहे. भारताचे पोलिओमुक्त स्थान कायम राखण्यासाठी आणि आतापर्यंत मिळविलेले यश टिकवून ठेवण्यासाठी, पल्स पोलिओ मोहीम राबविण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारने दिले आहेत.
लसीकरणाचा एकही डोस न मिळालेली बालके (Zero-dose Children) आणि अपूर्ण लसीकरण झालेली बालके ओळखणे, लसीकरणातून गळती होण्याचे प्रमाण कमी करणे तसेच लसीकरणाबाबतची अनास्था व गैरसमज दूर करणे या प्रमुख विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्यक्रमाअंतर्गत कुटुंब दत्तक कार्यक्रमांतर्गत (Family Adoption Programme) उच्च जोखमीच्या समुदायांमध्ये गृहभेटी देणे तसेच लसीकरणास नकार देणाऱ्या कुटुंबांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. बालरोगतज्ज्ञ आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी लसीकरणाचे डोस चुकलेल्या बालकांची ओळख पटवून त्यांना लसीकरणासाठी संदर्भित करण्याचे आवाहनही या बैठकीदरम्यान करण्यात आले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत कार्यरत कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची ओळख पटविणे, समुदायाचा सहभाग वाढवतानाच आणि लसीकरणानंतरचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणाबाबत जनजागृती अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच लसीकरणासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी मोहल्ला कमिटी, मुंबई पोलीस, धार्मिक नेते आणि समाजातील प्रभावशाली व्यक्ती यांच्या सहकार्याने सामुदायिक बैठका आणि जनजागृती मोहिम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. लाभार्थ्यांपैकी एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य संस्था, शासकीय विभाग आणि सामुदायिक संघटना यांच्या समन्वयातून सर्वंकष प्रयत्न करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटीबद्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व पालक आणि बालकांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना आवाहन करण्यात येते की, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीचे दोन डोस अवश्य पाजावेत. यापूर्वी पोलिओ लसीकरण झालेले असले तरीही या मोहिमेदरम्यान बालकाला पोलिओ लसीचे दोन डोस देणे आवश्यक आहे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
