
*पी.वी.आनंदपद्मनाभन*
*कल्याण*
या वर्षी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टी कमी प्रमाणात झाल्यामुळे, दुष्काळाचे सावट पसरले आहे. या दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी महापालिकेतर्फे आता आर्थिक मदत दिली जाणार आहे. महापालिकेच्या आजच्या म्हणजेच दि.१ ऑक्टोबरच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, दरवर्षी प्रमाणे वर्धापन दिन साजरा न करता, रु.२५ लक्ष इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली जाणार असल्याची माहिती महापौर हर्षाली चौधरी यांनी आज स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
त्याचप्रमाणे महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरीक यांना वर्धापन दिनानिमित्त महापौर हर्षाली चौधरी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी महापालिकेने उचललेले हे छोटे पाऊल असून, आजच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वर्ग ४ मधील सफाई कामगारांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली.
यासमयी उप महापौर राहुल दामले, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, सभागृह नेते वरुण पाटील, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सारिका जाधव, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, इतर पालिका सदस्य, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, महापालिका सचिव किशोर शेळके, उपआयुक्त वंदना गुळवे, सुषमा मांडगे, विराज लबडे तसेच पत्रकार वर्ग उपस्थित होता.
