पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ ते सहार गाव दरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम पूर्ण
• जी उत्तर, के दक्षिण, के उत्तर, एच पूर्व, एस व एन विभागाचा पाणीपुरवठा पूर्ववत
• नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे – महानगरपालिकेचे आवाहन
पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ (PHLR-1) ते सहार गाव दरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने विहीत वेळेत पूर्ण केले आहे. गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सुरु करण्यात आलेले दुरुस्ती काम शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्याने जी उत्तर, के दक्षिण, के उत्तर, एच पूर्व, एन आणि एस विभागातील काही परिसरांत बाधित झालेला पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे.
गळती दुरूस्ती कार्यवाही पूर्ण झाल्याने पुढील तीन ते चार दिवस कमी दाबाने व गढूळ पाणी पाणीपुरवळा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे नम्र आवाहन महानगर पालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
पवई ते सहार दरम्यान जलवाहिनीवरील पाणीगळती रोखण्यासाठी सदर काम हाती घेण्यात आले होते. जलवाहिनीवरील गळती तांत्रिक अडचणींमुळे बाहेरून दुरुस्त करणे शक्य नव्हती. त्यामुळे जलवाहिनी दुरूस्तीसाठी जलवाहिनीच्या आत प्रवेश करून गळती रोखण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
पवई ते सहार दरम्यानच्या १८०० मिमी व २४०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांवर एकूण १४ ठिकाणी गळती आढळून आली होती. सदर सर्व गळती जलवाहिनीच्या आत प्रवेश करून पूर्णपणे बंद करण्यात आली. तसेच ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील ९ ठिकाणच्या गळतीही पूर्णपणे बंद करण्यात महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाला यश आले आहे.
सदर काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी जल अभियंता विभागातील एकूण २० अभियंते व १८० कामगार २४ तास दिवस-रात्र कार्यरत होते. जलवाहिनीवरील गळती पूर्णपणे बंद केल्यामुळे जलवाहिनीतील पाण्याचा दाब सुधारण्यास मदत होणार असून पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.
