जितेंद्र साळुंके
चोरीला गेलेला ऐवज अखेर मूळ मालकांच्या हाती! मुंबई पोलिसांकडून ४१६ तक्रारदारांना दिलासा; २ कोटी ९३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल सुपूर
मुंबई पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत चोरीला गेलेला आणि विविध गुन्ह्यांमध्ये गहाळ झालेला तब्बल २ कोटी ९३ लाख ५९ हजार ६४३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकांना परत केला आहे. पश्चिम उपनगर (झोन ३) अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण ४१६ तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आला. अंधेरी, एमआयडीसी, मेघवाडी, जोगेश्वरी, साकीनाका आणि पवई पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन हा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईत सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सायबर फसवणुकीतील रक्कम हस्तगत करण्यात आली.
पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी या उत्कृष्ट कामगिरीची माहिती दिली. अनेक तक्रारदारांनी आपली कष्टाची कमाई आणि मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याने मुंबई पोलिसांचे आभार मानले.
ही मोहीम मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख आणि पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, जनतेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी मुंबई पोलीस सदैव कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
